अंबाजोगाई तालुक्यातील चनई-आडस रोडवर सध्या पवनचक्की प्रकल्पाचे मुख्य काम अतिशय वेगात सुरू असून, यासाठी लागणारी महाकाय यंत्रसामुग्री आणि अवजड वाहने दाखल झाली आहेत. या मुख्य प्लांटचे काम पूर्ण होताच भावठाणा, धावडी, केंद्रेवाडी आणि डोंगरपिंपळा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पवनचक्क्या उभारणीला सुरुवात होईल. विशेष म्हणजे, कंपनीने पवनचक्कीसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांना ॲडव्हान्स रक्कमही वाटप केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावर नसून प्रत्यक्षात वेगाने मार्गी लागला असल्याचा विश्वास निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे.

पवनऊर्जा हा हरित आणि शाश्वत ऊर्जेचा मोठा स्रोत असल्याने विजेच्या समस्येवर यातून कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात या पवनचक्क्या उभ्या राहणार आहेत, त्यांना कंपनीकडून दरवर्षी भाड्याच्या स्वरूपात एक निश्चित आणि कायमस्वरूपी उत्पन्न मिळणार आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतीला आता या खात्रीशीर उत्पन्नाची भक्कम जोड मिळणार आहे. यामुळे केवळ शेतकऱ्यांनाच आर्थिक आधार मिळणार नाही, तर संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.