बीड शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या तिरुमला हेअर ऑईल कंपनीत तांब्याची तार चोरताना रंगेहाथ पकडल्याने चोरांनी थेट सिक्युरिटी गार्डलाच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश हातागळे हे या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. दुपारी संकेत उमप, कृष्णा ऊर्फ गजनी डॉन बोराडे आणि कृष्णा कानडे हे तिघे संगनमत करून कंपनीतील आठ हजार रुपये किमतीची सात किलो कॉपर वायर चोरून नेत होते. चोरी करून माल घेऊन जात असताना ते रंगेहाथ सापडले. यावेळी या गुन्हेगारांनी "पोलिसांत केस केली तर जिवे मारून टाकू," अशी भयंकर धमकी सुरक्षारक्षकाला दिली. यानंतर अविनाश यांनी पेठ बीड पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली.
पोलिसांनी चोरीला गेलेली आठ हजार रुपयांची कॉपर वायर जप्त केली असून तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार कातखडे करत आहेत. चोरी पकडल्यावरही गुन्हेगारांकडून थेट धमक्या दिल्या जात असल्याने औद्योगिक वसाहतीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!