हॉलिवूडच्या चित्रपटांसारखे धोके नाहीत
बिझनेस इनसायडरच्या टीमने जगातील चार प्रमुख 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (कृत्रिम बुद्धिमत्ता) टूल्सना - चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड आणि ग्रोक - एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारला की, 'एआय मानवाचा विनाश कसा करू शकेल?' यावर सर्व चॅटबॉट्सनी स्पष्ट केले की, हॉलीवूड चित्रपटांप्रमाणे रोबोट्स थेट माणसांवर हल्ला करणार नाहीत. एआय माणसांचा शत्रू म्हणून वागणार नाही किंवा त्याच्यात माणसांबद्दल अचानक द्वेष निर्माण होणार नाही. मानवी विनाशाचा खरा धोका एआयच्या स्वभावात नाही, तर मानवी चुकीमध्येच दडलेला आहे.

गुगल जेमिनीचा खुलासा
गुगलच्या जेमिनीने तंत्रज्ञान तज्ज्ञांचा हवाला देत स्पष्ट केले की, एआय अधिक हुशार झाले तरी ते माणसांना संपवण्याचा विचार करणार नाही. विशेषतः लष्करी आणि 'न्यूक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर' (अण्वस्त्र यंत्रणा) इंटरनेटपासून पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या जातात आणि त्या मानवी नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे एआय अशा यंत्रणांवर थेट नियंत्रण मिळवून विनाश करेल, ही शक्यता अतिशय दुरापास्त आहे.

क्लॉड आणि ग्रोकचा गंभीर इशारा
अँथ्रोपिकचे क्लॉड आणि इलॉन मस्कच्या स्पेसएक्सचे ग्रोक यांनी मात्र एका अत्यंत भयानक धोक्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते:

  • एआयच्या मदतीने एखादी विकृत व्यक्ती किंवा दहशतवादी गट सहजपणे महाभयंकर 'बायो-वेपन्स' (जैविक शस्त्रे) बनवू शकतो.

  • यासाठी कोणत्याही मोठ्या प्रयोगशाळेची किंवा उच्च वैज्ञानिक पदवीची गरज भासणार नाही.

  • यातून एखादी जीवघेणी 'पँडेमिक' (जागतिक महामारी) पसरू शकते, जी मानवाच्या विनाशाला थेट कारणीभूत ठरेल.

चॅटजीपीटीने सांगितलेला सायबर धोक्याचा मार्ग
ओपनएआयच्या चॅटजीपीटीने 'सायबर अटॅक्स' (सायबर हल्ले) या महाभयंकर धोक्याची जाणीव करून दिली आहे. जर एआयचा गैरवापर करून जागतिक स्तरावर सायबर हल्ले झाले, तर जगभरातील 'पॉवर ग्रिड्स' (वीजपुरवठा यंत्रणा), बँकिंग व्यवस्था आणि 'कम्युनिकेशन सिस्टीम्स' (दळणवळण यंत्रणा) एका झटक्यात ठप्प होऊ शकतात. यामुळे संपूर्ण मानवी जनजीवन आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडेल. थोडक्यात सांगायचे तर, आपण माणसांहून अधिक हुशार एआय बनवून त्याच्यावरचे नियंत्रण गमावले, तर मानवासाठी परतीचा कोणताही मार्ग उरणार नाही.