अंबाजोगाई: अंबाजोगाई बसस्थानक परिसरात भरदिवसा एका शेतकऱ्याच्या दुचाकीची डिक्की उघडून अज्ञात चोरट्याने ९० हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळवटी तांडा क्रमांक २ (ता. अंबाजोगाई) येथे राहणारे आणि शेती व्यवसाय करणारे ५० वर्षीय फिर्यादी रावसाहेब पांडुरंग राठोड यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी एका व्यवहाराचे ९० हजार रुपये रोख स्वरुपात घेतले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या होंडा स्कुटीच्या डिक्कीत ठेवली होती. त्यानंतर ते बसस्थानकासमोरील गायत्री लॉजशेजारील गावरान गुळाच्या चहाच्या हॉटेलसमोर दुचाकी उभी करून चहा पिण्यासाठी व नंतर हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले.

दुपारी १:४० वाजेच्या सुमारास ते परत आले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या डिक्कीतील ९० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोधाशोध करूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी १८ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार हनुमान मुंडे हे करीत आहेत.

#AmbajogaiNews #BeedPolice #CrimeNewsMaharashtra #TheftAlert #MaharashtraNews