अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ३५ मध्ये हातात धारदार कोयता घेऊन दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला अंबाजोगाई शहर पोलिसांनी वेळीच धाडस दाखवत रंगेहाथ पकडले आहे. नौमान जब्बार शेख (वय १९, रा. कुंबेफळ, ता. अंबाजोगाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांच्या या तत्परतेमुळे रुग्णालयातील संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस अंमलदार मनोज घोडके, पोलीस हवालदार गित्ते आणि अंमलदार गडदे हे शहरात गस्त घालत होते. त्यावेळी स्वराती रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३५ मध्ये एक तरुण हातात कोयता घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी तातडीने दोन पंचांना सोबत घेऊन रुग्णालयात धाव घेतली आणि सापळा रचून आरोपी नौमान शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे दीड फूट लांबीचा, लोखंडी पाते आणि लाकडी मूठ असलेला धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.
सध्या बीड जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे मनाई आदेश लागू आहेत. असे असतानाही रुग्णालयासारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी जीवघेणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस अंमलदार मनोज घोडके यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश भोळे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!