अंबाजोगाई (प्रतिनिधी) - येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन व जागतिक औषधनिर्माता दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभाग व अंबाजोगाई तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी अंबाजोगाई शहर परिसरात जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अंबाजोगाई शहरातील फार्मासिस्ट यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके, अंबाजोगाई तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष, तालुका प्रतिनिधी तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि फार्मासिस्ट यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, एन.एस.एसचे स्वयंसेवक व फार्मासिस्ट यांचे स्वागत करण्यात आले. जनजागृती रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध जनजागृतीपर फलक व पोस्टर्स घेऊन औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे, औषधांचा योग्य डोस, औषधांची योग्य साठवणूक तसेच फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. रॅलीचे विशेष आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य ठरले. विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, संवाद आणि प्रसंगांच्या माध्यमातून औषधांचा गैरवापर, स्वतःहून औषधे घेण्याचे धोके, औषधांचा योग्य वापर आणि फार्मासिस्टची आरोग्यसेवेतील भूमिका याबाबत नागरिकांना माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी उपस्थित विद्यार्थी, एन.एस.एस स्वयंसेवक, प्राध्यापक व फार्मासिस्ट यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या फार्मसी ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी करून नागरिकांमध्ये औषधांच्या योग्य वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच फार्मांसिस्टनी आरोग्यसेवेतील आपली सामाजिक भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी रॅलीचे नियोजन, जनजागृतीपर फलक तयार करणे, घोषवाक्ये देणे, नागरिकांशी संवाद साधणे आणि पथनाट्य सादर करणे अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, संघभावना आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी, अंबाजोगाई तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट संघटनेचे पदाधिकारी आणि सहभागी फार्मासिस्ट यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास बी.फार्मसी महाविद्यालयातील डॉ.नरेशकुमार जैस्वाल, डॉ.गीतांजली चव्हाण, काव्या रेड्डी, मंजुषा करेप्पा, डॉ.रिजवान पठाण, इम्रान सय्यद, अश्विनी घोळकर, अमर कावरे, डॉ.विशाल साखरे, खलीक सय्यद, संभाजी गित्ते, प्रियंका मुंडे, रूपाली शिंदे, कोमल मोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मंदार चौधरी, सानिका माकोडे, अभिषेक चोले, शितल कराळे, रितीक लखेरा तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.