अंबाजोगाई: शहरात २० सप्टेंबर रोजी गुलाबचंद सारडा यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ५३ तोळे सोने आणि पावणे दोन किलो चांदीचे दागिने लांबवल्याची मोठी घटना घडली होती. या खळबळजनक घरफोडीचा छडा लावण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने परळी परिसरात सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून २७ तोळे (२७० ग्रॅम) सोने आणि ८५८ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीवरून लागला छडा
सारडा हे त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारला होता. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुतळे यांचे पथक समांतर तपास करीत होते. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन संशयित दुचाकीवरून जाताना प्रथमदर्शनी दिसून आले. २५ सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमर काकासाहेब थोरात आणि त्याचे साथीदार हे चोरी केलेले सोने विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. त्यानुसार परळी परिसरात सापळा रचून अमर थोरात यास शिताफीने पकडण्यात आले.
साथीदारांची नावे निष्पन्न, एक आरोपी अद्याप फरार
अमर थोरात याला पकडून अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या इतर साथीदारांची नावे उघड केली. त्याने दिलेल्या माहितीवरून जगजितसिंग अचलसिंग दुधानी यालाही तातडीने ताब्यात घेण्यात आले. या घरफोडीत त्यांचा तिसरा साथीदार मंगलसिंग हिरासिंग बावरी याचाही सहभाग असल्याचे आणि त्यांनी गुन्ह्यात युनिकॉर्न मोटारसायकल वापरल्याची कबुली दिली. सध्या मंगलसिंग बावरी फरार असून अंबाजोगाई शहर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पकडलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करत, त्यांना पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस पथक
ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, बीडचे अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्यासह हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे तसेच अंबाजोगाई शहरचे अंमलदार पांडुरंग काळे, हनुमंत चादर, नाईक तेजस वाहुळे व सुशांत गायकवाड यांनी मिळून ही कामगिरी केली. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील सविस्तर तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!