अंबाजोगाई: विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची भीती दूर करणारे 'हाऊ टू स्टडी' आणि लिओनार्डो दा विंची यांच्या अथांग बुद्धिमत्तेचा वेध घेणारे 'द हिडन माइंड ऑफ लिओनार्डो' या दोन पुस्तकांचा शानदार प्रकाशन सोहळा शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी अंबाजोगाईत पार पडला. केज विधानसभेच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक दगडू दादा लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. डॉ. मयुरी धायगुडे आणि त्यांची पंधरा वर्षीय कन्या तितिक्षा धायगुडे यांनी या पुस्तकांचे लेखन केले असून, या आगळ्यावेगळ्या माय-लेकींच्या साहित्यिक प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे 

तरुण पिढीने नवनिर्मितीकडे वळावे: आमदार नमिता मुंदडा

पुस्तकांचे प्रकाशन केल्यानंतर आमदार नमिता मुंदडा यांनी लेखिका माय-लेकींचे भरभरून कौतुक केले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तितिक्षाने घेतलेली झेप ही थक्क करणारी असून, आजच्या तरुण पिढीने केवळ वेळेचा अपव्यय न करता वाचन आणि अशा प्रकारच्या नवनिर्मितीकडे वळले पाहिजे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांनी महिलांना स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याचे व स्वतःसाठी अवकाश निर्माण करण्याचे आवाहन केले.   

मार्कशीटपेक्षा संकल्पना समजणे महत्त्वाचे: डॉ. शैलजा बरुरे

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. शैलजा बरुरे यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. पास-नापास या पलीकडे जाऊन मुलांनी शिक्षणाचे खरे महत्त्व जाणले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. केवळ पाठांतर न करता संकल्पना समजून घेण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. एका पंधरा वर्षांच्या मुलीने लिओनार्डो दा विंचीसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर सखोल अभ्यास करून पुस्तक लिहिणे, हे समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार डॉ. बरुरे यांनी काढले.   

वाचनसंस्कृती वाढीस लागण्याची गरज

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात अंबाजोगाईच्या साहित्यिक परंपरेचा दाखला दिला. तितिक्षासारख्या तरुण पिढीने साहित्यात येणे हे शहरासाठी भूषणावह असून, आजच्या काळात मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक पुस्तकांची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. 

याप्रसंगी डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, ॲड. मकरंद पत्की, रेणू झिरमिरे यांनी देखील दोन्ही लेखिकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत जोंधळे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. दिपक पाटील, संस्कृती गंगणे, प्रसंनजित मस्के, जागृती चव्हाण, सागर केंद्रे, ज्योती स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.