मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (१७ सप्टेंबर) राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड ते पुणे या बहुप्रतिक्षित थेट रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मागील वर्षी बीडकरांना दिलेला शब्द अजित पवार यांनी पाळला असून, या नव्या कनेक्टिव्हिटीमुळे बीडकरांचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
अजितदादांचे स्वप्न साकार
बीडचा विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढवणे हाच शासनाचा एकमेव ध्यास असल्याचे सुनेत्रा पवार यांनी या उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. मागील वर्षी १७ सप्टेंबरला बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली होती, त्यावेळी पुढच्या वर्षी बीडवरून थेट पुण्याला जाण्याची सुविधा मिळेल, असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे आणि राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पांसाठी दिलेल्या भरघोस निधीमुळे हे स्वप्न आज सत्यात उतरले असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. बीडकरांसाठी पुणे आणि मुंबई गाठणे आता अधिक सोपे झाले असून, स्थानिक व्यापाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांनाही या रेल्वेसेवेतून मोठी चालना मिळणार आहे.
दक्षिण भारताशी जोडला जाणार मार्ग
सध्या सुरू झालेली बीड-पुणे रेल्वेसेवा हा मराठवाड्याच्या विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यापुढील काळात बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गतीने कामे करून घेण्याची ग्वाही देत, अजित पवारांची विकासाची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती पणाला लावू, असेही त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना आवर्जून सांगितले.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!