आंतरवाली सराटी (जालना): दोन वेळा पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाणी आणि वैद्यकीय उपचार नाकारल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. तरीही हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईकडे कूच केले असून, कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान हजारो पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाच दिवसांचा प्रवास आणि पहिला मुक्काम
आंतरवाली सराटीतून निघालेल्या या मोर्चाचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होणार आहे. हा संपूर्ण प्रवास पाच दिवसांचा असणार असून त्यानंतर आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत. प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दुसरीकडे, आम्ही मुंबईत केवळ आंदोलन नाही तर गणपती दर्शनासाठीही जात असल्याचे आंदोलक सांगत आहेत.
परवानगीसाठी पोलिसांत तिसरा अर्ज दाखल
गणेशोत्सव आणि सुरक्षिततेचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी यापूर्वी जरांगे यांच्या आंदोलनाला दोनदा परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील काही वकिलांच्या माध्यमातून आझाद मैदान पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. यामध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या निवडक चार ते पाच सहकाऱ्यांना आंदोलनाची परवानगी द्यावी, अशी नवी मागणी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!