बीड: येथील विशेष न्यायालयात आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. न्यायदानास गती मिळावी यासाठी साक्षीदार आणि पुराव्यांची तपासणी तातडीने सुरू करावी, अशी जोरदार मागणी विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणातील जप्त पुराव्यांची 'चेन ऑफ कस्टडी' पूर्णपणे वैध असल्याचा दावा करण्यात आला असून, पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.

पुराव्यांशी कोणतीही छेडछाड नाही

गुन्हा घडल्यापासून ते फॉरेन्सिक लॅब आणि न्यायालयात पुरावे सादर करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर कमालीची सुरक्षा बाळगण्यात आली आहे. सर्व भौतिक व तांत्रिक पुरावे अत्यंत सुरक्षितपणे जतन करून हस्तांतरित करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला. जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार किंवा छेडछाड झालेली नाही, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत ही पुरावे साखळी कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

खटल्याला गती देण्याची गरज

संतोष देशमुख हत्याकांडाचे गांभीर्य आणि जिल्ह्याभराच्या तीव्र भावना लक्षात घेता मूळ खटल्याच्या सुनावणीला आता गती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी साक्षीदारांची तपासणी लवकरात लवकर सुरू करण्याची गरज सरकारी पक्षाने व्यक्त केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे सविस्तर म्हणणे ऐकून घेत या खटल्याची पुढील सुनावणी आता ३० सप्टेंबर रोजी ठेवली आहे.