मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील, दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर आणि राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सुरू असलेली चर्चा, या सर्व प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मराठा समाजाला भरघोस सवलती दिल्या असून, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांवर पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. "२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा निर्णय झाला, त्यानंतर माझ्या नेतृत्वाखालील सरकारने विशेष अधिवेशन बोलावून १० टक्के आरक्षण दिले. ५,३०० प्रलंबित नियुक्त्या मार्गी लावल्या, अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्जमर्यादा १० वरून १५ लाख केली आणि कुणबी नोंदी असणाऱ्यांना न्याय देण्यासाठी शिंदे समितीद्वारे प्रमाणपत्रेही दिली," अशी माहिती त्यांनी दिली.
इतर कोणत्याही समाजावर (ओबीसी इ.) अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "सरकार जर प्रश्न सोडवण्यासाठी चार पावले पुढे येत असेल, तर जरांगे पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी. सध्या मुंबईत गणेशोत्सव सुरू असून लाखो भाविक रस्त्यावर आहेत. अशावेळी कोणाचीही गैरसोय होऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जरांगे यांनी मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन शिंदेंनी केले.
केंद्राच्या समान नागरी कायद्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातही हा कायदा लागू करण्याचे संकेत दिले आहेत. "एका देशात, एका राज्यात समान कायदा असायला हवा, ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. आम्ही त्यांचेच विचार पुढे नेत आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. त्यामुळे सर्वांना समान हक्क आणि न्याय देण्यासाठी आमचे महायुती सरकार राज्यात लवकरच समान नागरी कायद्याबाबत (UCC) निर्णय घेईल," अशी माहिती त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवर निशाणा साधला. "दिशा सालियन प्रकरणात नुकताच सीबीआयने एफआयआर (FIR) दाखल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात जी अस्वस्थता आणि चीड दिसत आहे, ती त्याच कारणामुळे आहे, असा पलटवार शिंदेंनी केला. तसेच, या प्रकरणात पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे, असेही ते म्हणाले.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!