अंबाजोगाई: मनुष्याने केवळ भौतिक सुखाच्या मागे धावताना मानसिक शांतता गमावू नये; मन प्रसन्न असेल तरच आरोग्य निरोगी राहू शकते, असे प्रतिपादन पुणे येथील राजयोगिनी लक्ष्मी बहेनजी यांनी केले. अंबाजोगाई येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात आयोजित ‘पारिवारिक जीवनात आनंदाची चावी’ या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. केंद्राच्या संचालिका सुनिता बहेनजी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
सकारात्मक विचार आणि ध्यानाची गरज
आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडत असते, त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक विचार करण्याची सवय अंगीकारली पाहिजे, यावर लक्ष्मी बहेनजी यांनी भर दिला. चिंता, राग आणि तणावामुळे जीवनावर विपरित परिणाम होतो. यावर मात करण्यासाठी दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ आत्मचिंतन व मनापासून परमात्म्याचे स्मरण केल्यास मनाला खरी शांती लाभते, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
नात्यांमध्ये संयम आणि प्रेमाचे महत्त्व
कुटुंब सुखी ठेवण्यासाठी सदस्यांमध्ये परस्परांबद्दल आदर, संवाद आणि समजूतदारपणा असणे आवश्यक आहे. क्रोधाचा त्याग करून इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची दानत ठेवली पाहिजे, असे सांगत त्यांनी सहकार्याची भावना हीच खरी माणुसकी असल्याचे स्पष्ट केले. या व्याख्यानातून उपस्थितांनी राजयोग, ध्यान आणि कौटुंबिक मूल्यांविषयी सखोल मार्गदर्शन घेतले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!