केज: केज तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीत खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली आहेत. या संकटामुळे शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, महसूल, कृषी व पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने केलेल्या एकदिवसीय प्राथमिक पाहणीत तालुक्यातील प्रमुख पिकांचे तब्बल ८५ टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रशासनाकडून संयुक्त पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार भारत गंगावणे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आणि तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये चक्राकार पद्धतीने पाहणी केली. तालुक्यातील चिंचोली मंडळातील साळेगाव येथे सरपंच कैलास जाधव, जय जोगदंड, अक्षय वरपे, राजेश तिडके आणि पोलिस पाटील सुनील गालफाडे यांच्या उपस्थितीत महसूल मंडळ अधिकारी मस्के, ग्राममहसूल अधिकारी शुभम गाडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गव्हाणे, कृषी सहाय्यक अधिकारी शेळके व दत्तू लांडगे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले.

सोयाबीनसह अल्पमुदतीची पिके धोक्यात

केज तालुक्यात खरिपात प्रामुख्याने सोयाबीन आणि त्यानंतर कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन पाण्याअभावी सुकले असून भूगर्भातील पाणीपातळी खोल गेल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचे सुमारे ८५ टक्के नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असून, शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.