मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. आगामी गणेशोत्सव आणि मागील आंदोलनादरम्यान निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेत आझाद मैदान पोलिसांनी या आमरण उपोषणाला अधिकृतरीत्या परवानगी नाकारली आहे.

मनोज जरांगे यांनी सर्व अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र पोलिसांना दिले होते. मात्र, दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालये आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर या आंदोलनाचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परवानगी नाकारण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. लवकरच पोलिसांकडून जरांगे यांना आंदोलन न करण्याबाबतची नोटीस बजावली जाणार आहे.

मागील आंदोलनाचा दाखला आणि गणेशोत्सवाची पार्श्वभूमी

गेल्या वेळी आझाद मैदानात पाच हजार आंदोलकांची मर्यादा असताना त्यापेक्षा कितीतरी अधिक नागरिक जमा झाले होते. त्यावेळी सीएसएमटी आणि महानगरपालिका परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. याच परिस्थितीचा दाखला पोलिसांनी दिला आहे. याशिवाय, सध्या मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धामधूम असून भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अशातच एवढ्या मोठ्या आंदोलनामुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये मोठी बाधा निर्माण होऊ शकते, याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले आहे.