मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याची तयारी केली आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यासाठी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून रीतसर परवानगी मागितली आहे. १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून या पदयात्रेला सुरुवात होणार असून, अद्याप मुंबई पोलिसांकडून या पत्रावर कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही.
मुंबईच्या दिशेने असा असेल प्रवास
मनोज जरांगे पाटील हे १५ सप्टेंबरला आपल्या समर्थकांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघतील. पाटोदा, अहिल्यानगर, हडपसर, खोपोली आणि कोपरखैरणे असा टप्पा पार करत ही पदयात्रा १९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होईल. राज्य सरकारने मराठा समाजाच्या पंधरा प्रमुख मागण्या मान्य न केल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्याने अखेर आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शांततापूर्ण आंदोलनाची हमी
हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही व घटनात्मक चौकटीत, तसेच शांततेच्या मार्गाने होणार असल्याची ग्वाही आयोजकांनी पत्राद्वारे दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. आंदोलकांची अंदाजित संख्या, वाहनांचा तपशील आणि स्वयंसेवकांची यादी प्रशासनाला लवकरच सादर केली जाणार आहे. तसेच, पोलीस प्रशासनाच्या सर्व अटी, शर्ती आणि निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे हमीपत्रही जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!