अंबाजोगाई: रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या माजी अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक यांची रोटरी इंटरनॅशनलच्या १६ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'वुमन इन रोटरी इंटरनॅशनल' (WIRI) या अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कमिटीच्या चेअरपदी (अध्यक्ष) नियुक्ती झाली आहे. या निवडीमुळे अंबाजोगाईसारख्या ग्रामीण भागातील शहराचे नाव जागतिक पातळीवर अभिमानाने झळकले आहे. प्रा. पाठक यांनी समाजसेवा, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बजावलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन ही सर्वोच्च जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

जागतिक पातळीवर महिला नेतृत्वाला देणार दिशा

'डब्लू.आय.आर.आय.' ही रोटरी इंटरनॅशनलची एक प्रभावी आंतरराष्ट्रीय कमिटी असून यामध्ये भारत, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटलीसह जगातील १६ बलाढ्य देशांचा समावेश आहे. जगभरातील रोटरी संस्थांमध्ये महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्यासाठी हक्काचे व्यासपीठ उभारणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक प्रकल्प राबवणे हे या कमिटीचे प्रमुख कार्य आहे. आता या सर्व देशांमधील उपक्रमांचे आणि कमिटीचे थेट नेतृत्व प्रा. रोहिणी पाठक करणार आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेच्या कार्यकाळात अंबाजोगाई रोटरी क्लबने प्रांतात प्रथम क्रमांक पटकावला होता.

रोटरी परिवार व विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

प्रा. पाठक यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल जयेश पटेल, क्लबचे अध्यक्ष मोईन शेख, कल्याण काळे, राधेश्याम लोहिया, धनराज सोळंकी, प्रा. संतोष मोहिते यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक आणि रोटरी परिवारातील सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.