अंबाजोगाई - पर्यावरण संवर्धन आणि जलप्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व अंबाजोगाई नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात उभारण्यात आलेल्या चार कृत्रिम विसर्जन तलावांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील चौसाळकर कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिर परिसर, माळी नगरातील श्री संत सावता माळी चौक, गार्डन समोरील वंजारी क्रीडांगण मैदान आणि मोंढा रोडवरील जुना पेट्रोल पंप अशा प्रमुख चार ठिकाणी ही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात शेकडो भाविकांनी या कृत्रिम तलावांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण व पर्यावरणपूरक वातावरणात निरोप दिला.
मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाचा प्रारंभ
दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी या कृत्रिम तलावांचे उद्घाटन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष रो. शकील शेख, सचिव रो. राधेश्याम लोहिया, तसेच रो. धनराज सोलंकी, रो. रुपेश रामावत, रो. प्रविण चोकडा, रो. डॉ. निशिकांत पाचेगावकर, रो. प्रदीप झारकर, रो. कल्याण काळे, रो. अभिजीत बांदगर, रो. प्रा. रमेश सोनवळकर, रो. अविनाश मुडेगावकर, रो. डॉ. प्रिया तिडके, रो. शिवकुमार निर्मळे, रो. मयूर परदेशी आणि रो. संदीप जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नागरिकांची पर्यावरणविषयक सजगता
भाविकांच्या सोयीसाठी आणि मूर्ती संकलनासाठी फिरत्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी रोटरी क्लबच्या सदस्यांनी प्रत्येक केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना सहकार्य केले. स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर घडविण्याच्या संकल्पाला अंबाजोगाईकरांनी भरभरून साथ दिल्याने या संयुक्त उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!