परळी वैजनाथ: परळी शहरासह ग्रामीण भागाला दुष्काळाच्या छायेतून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने शहरालगतच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. जलनायक मयंक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली घनशी नदी (वेणूमती), सरस्वती आणि ब्रह्मगंगा या प्रमुख नद्यांसह त्यांच्या उपनद्यांचे सुमारे ५० किलोमीटर अंतराचे पुनरुज्जीवन केले जाणार असून, मंगळवार, १५ सप्टेंबरपासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली आहे.

शहर आणि ग्रामीण भागाची होणार पाणीटंचाईतून मुक्ती


परळी नगरपालिकेच्या डॉ. भालचंद्र वाचनालयात या संदर्भात मयंक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या उपक्रमामुळे परळी शहरासह चांदापूर, कन्हेरवाडी, जिरेवाडी, जलालपूर, ब्रह्मवाडी, संगम, वाघबेट आणि कौठळी या गावांना थेट फायदा होणार आहे. नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी ‘ग्लोबल रिव्हर आक्वाशाफ्ट’ (GRA) तंत्रज्ञानाचा वापर करून बोअरवेलद्वारे भूजल पुनर्भरण केले जाईल. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढून परिसराला दीर्घकालीन जलसुरक्षा लाभेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.


लोकसहभागातून जलचळवळ उभारण्याचा निर्धार


हा प्रकल्प केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न ठेवता लोकचळवळीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी समन्वय समित्यांची स्थापना करून स्थानिक नागरिकांचा सहभाग नोंदवला जाईल. ग्लोबल विकास ट्रस्टने यापूर्वी परळी, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर तालुक्यांमध्ये ११९ किलोमीटर नद्यांचे यशस्वी पुनरुज्जीवन केले असून त्याचा सकारात्मक परिणाम अनेक गावांत दिसून येत आहे. या कामामुळे तालुक्याचा दुष्काळ कायमचा संपण्यास मोठी मदत होईल, असा ठाम विश्वास मयंक गांधी यांनी व्यक्त केला. या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.