परळी: पांगरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनवरून होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या कारणावरून पांगरी आणि तळेगाव या लगतच्या दोन गावांमधील वाद टोकाला पोहोचला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या संतापातून सोमवारी सकाळी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळे रस्ता रोको आंदोलन केले. एकाच वेळी झालेल्या या आंदोलनांमुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन ते साडेतीन तास पूर्णपणे ठप्प झाली होती.

तळेगावचा साडेतीन तास ठिय्या

तळेगावला पांगरी सबस्टेशनमधून स्वतंत्र फिडरद्वारे वीज पुरवली जाते. मात्र, रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी या फिडरच्या तारा तोडून आणि खांब पाडून वीजपुरवठा तोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून गाव अंधारात बुडाले असून पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने संतप्त तळेगावकरांनी सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. स्वतःच्या शेतीसाठी वीज लाटण्याच्या उद्देशाने पांगरीतील काही व्यक्तींनी ही मनमानी केल्याचा थेट आरोप तळेगावच्या सरपंचांनी केला असून या प्रकरणी महावितरण आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पांगरीचे ग्रामस्थही रस्त्यावर

दुसरीकडे, पांगरी गोपीनाथ गड येथील सबस्टेशन रविवारी सकाळपासून बंद पडल्याने पांगरीसह परिसरातील अनेक गावे अंधारात गेली आहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीतच मुख्य वीजवाहिनीवर जाणीवपूर्वक बिघाड घडवून आणल्याचा आरोप करत पांगरीतील ग्रामस्थही आक्रमक झाले. त्यांनी सकाळी १०.३० ते दुपारी १२.४५ दरम्यान महामार्गावर रस्ता रोको करत वीजपुरवठ्यात खोडा घालणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. एकाच प्रश्नावरून दोन गावे समोरासमोर आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.