अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाईसह संपूर्ण परिसरात पावसाच्या मोठ्या खंडामुळे तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने कापूस, सोयाबीन, मूग, तूर यांसारखी पिके शेतातच करपून खाक झाली आहेत. या भीषण संकटामुळे बळीराजा आणि पशुपालक आर्थिक विवंचनेत सापडले असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने बाधित शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच जनावरांसाठी चारा डेपो व चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी केज मतदार संघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जलसाठे कोरडे; ऊस पिकाचीही वाताहत
पावसाअभावी परिसरातील नदी-नाले, बंधारे आणि साठवण तलावांमध्ये पाणीसाठा न झाल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई अधिक गडद झाली आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, परिणामी उभ्या उसावर रोग पडून पिके वाळू लागली आहेत. खरिपापाठोपाठ नगदी पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने ग्रामीण भागाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
लाखो पशुधनाचा प्रश्न ऐरणीवर
पिके करपल्याने शेतातून मिळणारा चारा पूर्णपणे बंद झाला असून जिल्ह्यातील आठ ते दहा लाख पशुधनाच्या जगण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. भविष्यात चार्याचे भाव वाढल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना जनावरे सांभाळणे अशक्य होईल आणि पशुधन विकण्याची वेळ ओढवेल. त्यामुळे जनावरांचे आरोग्य आणि दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी शासनाने तात्काळ चारा छावण्यांचे नियोजन करावे. निसर्गाच्या या तडाख्यातून सावरण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता विशेष निधी मंजूर करून दुष्काळी उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, हीच ग्रामीण भागातील जनतेची आग्रही मागणी आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!