बीड जिल्ह्यातील नेकनूर बसस्थानकावर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुण शेतकरी महिलेच्या बॅगेतून अज्ञात भामट्याने तब्बल एक लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या चोरीमुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

वडवणी तालुक्यातील मामळा येथे राहणाऱ्या २१ वर्षीय संध्या दीपक खळगे या २६ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास बसमधून प्रवास करत होत्या. नेकनूर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने त्यांच्या बॅगेत हातसफाई केली. या चोराने बॅगेतील चार हजार रुपयांची रोख रक्कम, आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुंबर आणि बारा ग्रॅम वजनाचे मिनी गंठण असा एकूण एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज अलगद चोरून नेला. आपले कष्टाचे पैसे आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच संध्या यांना मोठा मानसिक धक्का बसला.

या प्रकरणी संध्या खळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ सप्टेंबर रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सांगळे हे करत असून, एसटी स्टँडवर वाढणाऱ्या या भुरट्या चोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांमधून होत आहे.