बीड शहरातील एमआयडीसी रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरांनी पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकारामुळे शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलकनंदा सुभाषचंद्र शिकची (रा. विप्रनगर, बीड) असे लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलकनंदा या नेहमीप्रमाणे सकाळी एमआयडीसी रोडवरील त्रिमूर्ती वाईन समोरील आस्तेकर यांच्या घराजवळून पायी चालत होत्या. त्याचवेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाचे जुने सोन्याचे मिनीगंठण जोरात हिसकावले आणि वेगात पळ काढला. चोरीला गेलेल्या या दागिन्याची किंमत अंदाजे ९० हजार रुपये आहे.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे धक्का बसलेल्या अलकनंदा शिकची यांनी पेठ बीड पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात दुचाकीस्वार चोरांवर भारतीय न्याय संहितेच्या नव्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुजारी करत आहेत. भल्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.