गेवराई तालुक्यातील दारलुम येथे नवरा-बायकोच्या कौटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्यांना हटकणे एका ३७ वर्षीय मजुराला चांगलेच महागात पडले आहे. रागाच्या भरात दोघा भावांनी या मजुराच्या डोक्यात थेट घराबाहेर पडलेले संडासचे (बाथरूमचे) खराब भांडे मारून त्याला रक्तबंबाळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा राडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील विठ्ठल पिंगळे (सध्या रा. दारलुम, मूळ रा. घोगर्डे, ता. अंबड) असे या जखमी मजुराचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सुनील यांचे त्यांच्या पत्नीसोबत भांडण सुरू होते. यावेळी तिथे आलेल्या अजय विजय नाडे आणि सागर विजय नाडे (दोघे रा. निपाणीजवळका, ता. गेवराई) यांनी सुनील यांना 'तू मावशीला का शिवीगाळ करतोस?' असे विचारले. त्यावर सुनील यांनी 'माझ्या पत्नीसोबत माझा वाद सुरू असताना तुम्ही मध्ये का बोलता?' असा सवाल केला. याचाच राग आल्याने दोन्ही आरोपींनी सुनील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच घराबाहेर पडलेले संडासचे जुने भांडे उचलून थेट सुनील यांच्या डोक्यात मारले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी सुनील पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अजय नाडे आणि सागर नाडे या दोघांवर भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डोळस हे करत आहेत.