बीड : जिल्ह्यातील दुष्काळाची गंभीर स्थिती पाहता प्रशासनाने पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्वंकष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान आणि सहायक जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता यांच्यासह सर्व तहसीलदार व विभागप्रमुख उपस्थित होते.

पुढील दहा महिन्यांचे सूक्ष्म नियोजन

प्रत्येक गाव आणि तांड्याची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील दहा महिन्यांचे पाणी व चाऱ्याचे नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. केवळ टँकरवर विसंबून न राहता तात्पुरती पाइपलाइन यांसारख्या दीर्घकालीन पर्यायांचा विचार करावा, तसेच पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. टंचाई काळात गावात रोजगार हमी योजनेची कामे वेळेत सुरू करून मजुरी त्वरित द्यावी, तसेच आर्थिक ओढाताणीतून अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सामूहिक विवाह मेळावे आयोजित करावेत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात भीषण टंचाईचे सावट

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या केवळ ६३ टक्के पाऊस झाला असून गेवराईत परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. जिल्ह्यातील १६४ प्रकल्पांत अवघा १६.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ३२ प्रकल्प पूर्ण कोरडे पडले आहेत. भूजल पातळीत साडेचार मीटरहून अधिक घट नोंदवली गेली आहे. सध्या ६३ गावे आणि ७१ वाड्यांमध्ये १४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध चारा सरासरी ३७ दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने पाटोदा व आष्टी तालुक्यांत संकट गडद झाले आहे. खरीप हंगामात सुमारे ५.१४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कार्यालयीन शिस्त आणि सेवा संकल्प अभियान

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि स्वच्छता राखण्यावर भर देताना आयुक्तांनी कडक इशारा दिला. ९ ऑक्टोबरनंतर शासकीय कार्यालये किंवा शौचालयांत अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, तसेच अधिकाऱ्यांच्या केबिनमधील शौचालये सील केली जातील. दरम्यान, १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि तालुकानिहाय महसूल समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न वेगाने निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.