केज: तालुक्यातील आनंदगाव शिवारात सर्व्हे क्रमांक १२८ मध्ये विनापरवानगी १०० ते १२० ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी कठोर दंडात्मक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी एका जेसीबी व दोन ट्रॅक्टर मालकांसह उत्खनन करणाऱ्या अशा एकूण चौघांना २३ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

रंगेहाथ कारवाई आणि जप्ती आनंदगाव शिवारात विनापरवाना मुरुमाचे उत्खनन सुरू असताना तत्कालीन तहसीलदार भारत गंगावणे यांनी २८ सप्टेंबर रोजी धाव घेऊन एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर रंगेहाथ पकडले होते. मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करून ही वाहने तहसील आवारात जमा करण्यात आली होती. त्यानंतर उत्खनन करणारे ऋषिकेश कदम, जेसीबी मालक अंकित चोपणे, ट्रॅक्टर मालक अमर गायकवाड आणि गणेश राऊत यांना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, त्यांनी सादर केलेला लेखी खुलासा अमान्य करत उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी १३ ऑक्टोबर रोजी हा दंड ठोठावला.

१५ लाख ४७ हजारांचा दंड भरून वाहने मुक्त प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईत जेसीबी मालक अंकित चोपणे यांना १० लाख ९८ हजार ७०० रुपये, ट्रॅक्टर मालक अमर गायकवाड यांना ४ लाख ४८ हजार ७०० रुपये, विना नंबर ट्रॅक्टर मालक गणेश राऊत यांना ४ लाख ४८ हजार ७०० रुपये आणि ऋषिकेश कदम यांना ३ लाख ४८ हजार ७०० रुपये दंड करण्यात आला होता. या आदेशानंतर अंकित चोपणे आणि अमर गायकवाड यांनी एकत्रित १५ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा दंड बँकेत भरणा केला. वाहनांची विक्री किंवा हस्तांतरण करणार नाही असे हमीपत्र दिल्यानंतर त्यांची जप्त वाहने सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याची माहिती तहसीलदार अशोक भंडारे यांनी दिली.