बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका तरुण सोनारावर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. शेलापुरी परिसरातील वरद हॉस्पिटलसमोर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा थरार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, भाटवडगावचे रहिवासी असलेले ३२ वर्षीय सराफा व्यापारी श्याम रामदास कुळथे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीला मुद्दामून जोराची धडक दिली. श्याम खाली पडताच तिथे आणखी दोन अनोळखी लोक आले. या तिघांनी मिळून श्याम यांना बांबूच्या काठ्या आणि लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात श्याम यांचा उजवा हात आणि दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत. तसेच पाठीवर, कंबरेवर आणि डाव्या हातावर त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, अचानक झालेल्या या राड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्याम कुळथे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत. दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला टार्गेट केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.