बीड: ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख पुसत, बीड जिल्ह्याने रेशीम शेतीत मोठी क्रांती केली आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्यात अव्वल स्थानी असलेल्या बीडमध्ये २०२५-२६ या वर्षात तब्बल १,४९३ मेट्रिक टन रेशीम कोषाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. शासनाच्या विविध योजना, योग्य मार्गदर्शन आणि स्थानिक बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे सुमारे ४ हजार ६०० शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून या फायदेशीर व्यवसायाकडे वळले आहेत.

शेतकऱ्यांचा वाढता कल
सध्या जिल्ह्यात सुमारे ४ हजार ५०० एकर क्षेत्रावर तुतीची लागवड असून मराठवाड्याच्या एकूण उत्पादनात बीडचा वाटा तब्बल २५ टक्के आहे. अल्प पावसातही शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा एक सक्षम पर्याय ठरत आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे येत्या २०२६-२७ या वर्षात जिल्ह्यात आणखी दोन हजार शेतकरी रेशीम उद्योगात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाजारपेठ आणि अर्थसाहाय्य
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कोष खरेदीची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा विक्रीचा मोठा प्रश्न सुटला आहे. सध्या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल ७० हजार ते ९५ हजार रुपयांपर्यंत अत्यंत आकर्षक दर मिळत आहे. या उच्च दर्जाच्या कोषासाठी आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे व्यापारी थेट बीडमध्ये येऊन खरेदी करत आहेत.

रेशीम शेतीसाठी शासनाकडून एका एकरासाठी सव्वातीन ते साडेचार लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. सोबतच सिरसाळा येथील 'ग्लोबल विकास ट्रस्ट'सारख्या संस्थाही प्रोत्साहनपर मदत आणि मार्गदर्शन करत आहेत. उत्पन्नाची खात्री आणि योग्य बाजारपेठ यामुळे बीडमधील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून जिल्ह्याचे अर्थकारण वेगाने बदलत आहे.