बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी 'कोटपा' कायद्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या परिसरात कोणीही मावा खाऊन थुंकू नये, यासाठी आरोग्य विभागापासूनच या मोहिमेची सुरुवात करावी, असे जॉन्सन यांनी स्पष्ट केले. तसेच, शाळांच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे अंमली किंवा तंबाखूजन्य पदार्थ मिळता कामा नयेत. शाळेच्या परिसरात मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर मुख्याध्यापकांनी कोटपा कायद्यांतर्गत थेट दंडात्मक कारवाई करण्याचे थेट निर्देश देण्यात आले आहेत.

शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत यासाठी शाळा परिसर तंबाखूमुक्त ठेवणे बंधनकारक असून, याकामी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय शालेय पातळीवर व्यसनमुक्तीचे जनजागृती कार्यक्रम राबवून सर्व विभागांनी समन्वयाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, असेही ते म्हणाले.