अंबाजोगाई: तालुक्यातील पट्टीवडगाव परिसरात दीड ते दोन महिन्यांच्या पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. उजनी महसूल मंडळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी उभी पिके करपून गेल्याने नैराश्यातून थेट सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या केवळ तारखाच पदरी पडल्याने आणि पावसाची आशा मावळल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाने आता रब्बी हंगामाच्या तयारीसाठी हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे.
आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा
सोयाबीन आणि कापूस ही या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारी प्रमुख पिके आहेत. मात्र, पावसाअभावी या पिकांची वाढ खुंटली असून ती डोळ्यादेखत जळून खाक होत आहेत. महागडे बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च मातीत मिसळला आहे. आजमितीला जरी दमदार पाऊस झाला तरी खरीप हंगाम हातून गेल्याची जाणीव शेतकऱ्याला झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जळालेले पीक काढून टाकण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगर आणि मोगडा फिरवण्यास सुरुवात केली आहे.
चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
शेतीचे झालेले नुकसान तर मोठे आहेच, पण त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. डोंगराळ आणि हलक्या जमिनीवरील पिकांमध्ये शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी सोडून देत आहेत. वर्षभराचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या हजारो शेतकरी कुटुंबांसमोर आता पुढील वर्षभर कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, जनावरांना काय खाऊ घालायचे आणि बँकांचे कर्ज कसे फेडायचे, असे अनेक भीषण प्रश्न उभे राहिले आहेत.
तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
निसर्गावर अवलंबून असलेली शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची खंत पट्टीवडगावचे शेतकरी चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे, अद्याप ई-पीक पाहणी किंवा नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे पीक विमा आणि नुकसान भरपाई कशी मिळणार, असा संतप्त सवाल शेतकरी अमोल गित्ते यांनी उपस्थित केला आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.










प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!