बीड - बीड जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेल्या दुभाजकामुळे रुग्णवाहिका तसेच रुग्णांना रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचताना अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताना वेळ महत्त्वाचा असतो. त्यामुळे रुग्णालयाचा प्रवेशमार्ग अडथळामुक्त ठेवावा, अशी मागणी किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी जी तांदळे, सामाजिक कार्यकर्ते तथा महा एनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची उपस्थिती होती रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील दुभाजकाची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी मार्ग खुला करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालय हे बीड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. अपघातग्रस्त, अत्यवस्थ तसेच गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी येथे आणले जाते. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी अनावश्यक वळसा घ्यावा लागल्यास उपचार सुरू होण्यास विलंब होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त पाहणीची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी घेऊन रुग्णालय परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने आढावा घ्यावा. रुग्णवाहिकांसाठी २४ तास स्वतंत्र व थेट प्रवेशमार्ग उपलब्ध करून द्यावा. तसेच आवश्यकतेनुसार दुभाजकाचा भाग हटवून रुग्णालयाचा मार्ग अडथळामुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योग्य दिशादर्शक फलक, वाहतूक नियोजन आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
"विकासकामे नागरिकांच्या सुविधेसाठी असतात. मात्र रस्त्याच्या नियोजनामुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवेलाच अडथळा निर्माण होत असेल तर त्याचा तातडीने पुनर्विचार होणे आवश्यक आहे. रुग्णवाहिकेला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत विनाअडथळा पोहोचता आले पाहिजे," असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!