बीड: बीड जिल्हा कारागृह जणू काही गुन्हेगारांचे अभयगृहच बनले असून, तेथून सर्रास सुरू असलेल्या बेकायदेशीर कारभाराने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कारागृहाच्या आत बसून कैद्यांकडून बाहेरील व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कट रचले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अत्यंत संतापजनक आणि कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेत खा.बजरंग सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, कारागृह अधीक्षक तथा दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे, बीड जिल्हा कारागृहात कैद्यांकडून बेकायदेशीर मोबाईलचा वापर आणि बाहेरील व्यक्तींशी सतत संपर्क साधला जात असल्याबाबत यापूर्वीच ३ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, यावर कारागृह प्रशासनाने केवळ टाळाटाळ केली असून, दोषींवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या डोळेझाक भूमिकेमुळेच गुन्हेगारांचे फावले असल्याचे यावरून स्पष्ट होते. दि.१ऑक्टोबर २०२६ रोजी समोर आलेल्या एका कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे सर्व कारभार चव्हाट्यावर आला आहे. कारागृहात बंदिस्त असलेला आरोपी वाल्मीक कराड हा आतूनच बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क साधून निष्पाप व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट रचत असल्याचे या रेकॉर्डिंगमधून उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर, विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेवून जाळपोळ-आंदोलनाची परिस्थिती निर्माण करणे आणि जिल्हा व पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्याच्या धमक्या देण्याच्या सूचना या ऑडिओमधून दिल्या जात आहेत. कारागृहाच्या आतून जर अशा प्रकारे नियोजनबद्ध गुन्हेगारी कट रचले जात असतील, तर त्याचा थेट आणि घातक परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर, सामाजिक सलोख्यावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर होत आहे. हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून सुरक्षेचा आणि कर्तव्यपालनाचा अत्यंत गंभीर भंग आहे, अशा शब्दांत खा. बजरंग सोनवणे यांनी संताप व्यक्त केला आहे. या गुन्हेगारी कारस्थानाला पाठीशी घालणाऱ्या आणि कर्तव्यात कुचराई करणाऱ्या बीड जिल्हा कारागृह अधीक्षक तसेच संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ लेखी स्वरूपात सादर करावा, असेही पत्रात म्हटले आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.