बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत एका मुलीने साथीदाराच्या मदतीने स्वतःच्याच मामाच्या किंवा नातेवाईकाच्या घरातून ३ लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडा येथील तेली गल्लीत राहणाऱ्या शुभांगी गणेश देवकर यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास देवकर कुटुंब घराबाहेर गणपती विसर्जन मिरवणूक पाहत थांबले होते. याच वेळी त्यांच्या नणंदेची मुलगी स्नेहल रणखांब हिने घरातील सुटकेसमधून १ लाख ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम चोरली. तिने हे सर्व दागिने व पैसे घराच्या गेटजवळ उभा असलेला तिचा साथीदार वैभव ऊर्फ सनी गुगळे याच्याकडे दिले. वैभव हा मुद्देमाल घेऊन मिरवणुकीच्या गर्दीत पसार झाला. हा सर्व प्रकार फिर्यादीच्या दिराने पाहिला. घरात आल्यावर सुटकेस उघडी दिसल्याने चोरी उघडकीस आली. आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर उशिराने म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी आष्टी पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) आणि ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!