अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथे पत्नीला सासरी नेण्यासाठी आलेल्या जावयावर सासऱ्यासह नातेवाईकांनी वस्तऱ्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २ ऑक्टोबर रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात सासऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील साहेबराव सिरसाट हे आपली पत्नी प्रतीक्षा हिला घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता दरडवाडी येथे गेले होते. त्यावेळी सासरे व्यंकटी वाघ यांनी 'मुलीला नांदायला पाठवणार नाही, आम्हाला फारकत घ्यायची आहे' असे म्हणत सुनील यांना शिवीगाळ केली. सुनील यांनी यावर जाब विचारताच सासऱ्याने त्यांना गचांडी धरून खाली पाडले आणि वस्तऱ्याने त्यांच्या डाव्या हातावर, छातीवर आणि पायावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच तिथे उपस्थित असलेले प्रतीक वाघ, राजेभाऊ वाघ, बालाजी वाघ आणि मीरा वाघ यांनी सुनील आणि त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुन्हा गावात दिसल्यास जिवे मारण्याची भयंकर धमकीही या आरोपींनी दिली. या प्रकारानंतर सुनील सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार फड हे पुढील तपास करत आहेत.