अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक रोहिदास वाघमारे यांना दोषी ठरवत एक महिना कारावास आणि ४ लाख २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ऊसतोड मजुरांच्या पुरवठ्यासाठी घेतलेल्या रकमेचा धनादेश न वटल्याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली असून, फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण योगीराज मेटे यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील तट बोरगाव येथील पवन गोपाळराव सोमवंशी हे साखर कारखान्यांना ऊस पुरवठ्याचे काम करतात. २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी त्यांनी कळंब येथील नॅचरल शुगर कारखान्यासोबत करार केला होता. त्यांना ऊसतोड मजुरांची आवश्यकता असल्याने, त्यांनी मजूर पुरवठादार असलेले मुखेडचे (जि. नांदेड) रोहिदास वाघमारे यांच्यासोबत करार करून सात लाख वीस हजार रुपयांची उचल दिली होती. मात्र, आगाऊ रक्कम घेऊनही वाघमारे यांनी मजुरांचा पुरवठा केला नाही.

सोमवंशी यांनी पैशांचा तगादा लावल्यानंतर वाघमारे यांनी तीन लाख रुपये रोख दिले व उर्वरित चार लाख वीस हजार रुपयांसाठी धनादेश दिला. हा धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ३० ऑगस्ट २०१९ रोजी परत आला. त्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवूनही रक्कम न मिळाल्याने सोमवंशी यांनी अंबाजोगाई न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. प्रवीण मेटे यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने वाघमारे यांना शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. या कामी अ‍ॅड. प्रवीण मेटे आणि अ‍ॅड. दत्ता पवार यांनी फिर्यादीची बाजू भक्कमपणे मांडली.