बीड जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घराचे बांधकाम पूर्ण केलेल्या ४२ हजार १२६ लाभार्थ्यांना ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या ५० हजार रुपयांच्या अतिरिक्त अनुदानापैकी बांधकामासाठीचे प्रत्येकी ३५ हजार रुपये देण्यासाठी जिल्ह्याला १४७ कोटी ४४ लाख १० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीच्या वाटपास सुरुवात झाली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार २०२४-२५ पासून मंजूर झालेल्या घरकुलांना पूर्वीच्या १ लाख २० हजार रुपये आणि मनरेगाच्या २८ हजार रुपयांच्या अनुदानासह आता अतिरिक्त ५० हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे एका घरकुलाचे एकूण अनुदान आता १ लाख ९८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यातील ३५ हजार रुपये बांधकामासाठी सध्या दिले जात असून, उर्वरित १५ हजार रुपये घरावर एक किलोवॅटचा सोलार बसवल्यानंतर मिळणार आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ८० हजार ५९४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून अंबाजोगाई, केज, परळी आणि बीडसह सर्व तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामीण विकास यंत्रणेला मिळाली आहे. मागील आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले हे अनुदान थेट ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी दिली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!