बीड तालुक्यातील नेकनूर येथील शिंदे वस्ती परिसरातील शेतातील विहिरीतून दोन विद्युत मोटारी आणि केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. चौदा ऑक्टोबरच्या सायंकाळपासून पंधरा ऑक्टोबरदरम्यान ही चोरी झाली असून शेतकऱ्यांचे सुमारे १२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकरी अशोक कोंडीबा शिंदे यांनी विहिरीत सिंचनासाठी बसवलेली झिडको कंपनीची आणि लक्ष्मी कंपनीची ५ एचपी मोटार व केबल असा माल चोरीला गेला आहे. याप्रकरणी अशोक शिंदे यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत गावातीलच साक्या दशरथ शिंदे आणि अनिल नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करत तक्रार दिली. पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार परजने तपास करत आहेत.