बीड: श्री.क्षेत्र नारायणगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक दसरा मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. २० तारखेला मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर खा.बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी नारायणगडावरील मेळावा मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

नारायणगडावर होणारा दसरा मेळावा हा भाविक आणि मराठा समाजासाठी श्रद्धेचा व ऊर्जेचा स्रोत मानला जातो. या वर्षीच्या मेळाव्याला लाखो भाविक व नागरिक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेळाव्याची तयारी वेगाने सुरू आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ आणि अद्ययावत साऊंड सिस्टीमची (ध्वनिवर्धक व्यवस्था) संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. शुक्रवारी त्यांनी व्यासपीठाच्या ठिकाणी भेट देऊन आवश्यक सोयी-सुविधांची चाचपणी केली. या पाहणीदरम्यान गडाच्या व्यासपीठ उभारणीच्या कामाचा औपचारिक शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी श्री.क्षेत्र नगद नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राजेसाहेब देशमुख, गंगाधर काळकुटे यांच्यासह मराठा सेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठ आणि मैदानाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा.बजरंग सोनवणे यांनी गडाप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे यंदाच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मैदानातील आसनव्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी आणि वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर व स्वयंसेवकांकडून नियोजन सुरू आहे.

०००
मी नारायणगडाचा एक निष्ठावंत भक्त आहे. गडावर होणाऱ्या पारंपारिक दसरा मेळाव्याला मी दरवर्षी न चुकता उपस्थित राहत आलो आहे आणि पुढेही येत राहीन. नारायणगडावरील या दसरा मेळाव्यातून आपल्या सर्वांनाच एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. त्यामुळे या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मी गडाचा सेवक म्हणून सातत्याने काम करत राहीन. आपण सर्वांनी दसरा मेळाव्याला उपस्थित रहावे.
-खा.बजरंग सोनवणे, लोकसभा मतदारसंघ, बीड.