बीड - ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संकल्प कॅन्सर स्क्रीनिंग प्रकल्पांतर्गत मोबाईल मेडिकल युनिटचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते कर्करोग तपासणीसाठी मोबाईल मेडिकल युनिटचे उद्घाटन करत हिरवी झेंडी दाखवून वाहनाला मार्गस्थ करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, पाटोदाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र कासट, सन फार्माचे सोमनाथ दादास व साईधाम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील शिरसाठ, प्रकल्प समन्वयक वैभव दत्तनगिरे, स्वीय सहायक गिरीश मोहेकर यांची उपस्थिती होती.
सन फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून आणि शिर्डीच्या साईधाम फाऊंडेशनच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि शिरूर कासार या दोन तालुक्यांमधील ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यासाठी दि.30 मार्च 2027 पर्यंत एकुण 10 हजार व्यक्तींच्या कर्करोग तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संकल्प कॅन्सर स्क्रीनिंग प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या तीन महत्त्वाच्या कर्करोगाच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात भीती, आर्थिक अडचण किंवा अपुऱ्या माहितीमुळे लोक वेळेवर तपासणी करत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन थेट गावपातळीवर आधुनिक उपकरणांसह वैद्यकीय पथक पोहोचविले जाणार आहे. प्राथमिक तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन व पुढील पाठपुरावा करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने या मोहिमेबाबत गावात जनजागृती केली जात आहे.
मोबाईल मेडिकल युनिटच्या शुभारंभामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रीय कामकाजाला अधिक बळ मिळणार असून, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील नागरिकांपर्यंत कर्करोग तपासणी सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. कर्करोगाविषयी जागरूकता, वेळेवर तपासणी, उपचार आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांचे आरोग्य जपण्याचा संकल्प या उपक्रमातून पुढे नेण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः मोबाईल व्हॅनमधील सर्व अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रांची बारकाईने माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णांची तपासणी कशी केली जाते आणि कोणती वैद्यकीय प्रक्रिया राबविली जाते, याचा थेट आढावा घेतला. या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त गरजू रुग्णापर्यंत पोहोचता यावे, यासाठी त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तसेच कर्करोगाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून संशयित रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!