बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन नुकतेच एका अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक कार्यक्रमाने गजबजून गेले होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी जिल्ह्यात 'कलेक्टरशी गप्पा' हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोतन (तालुका पाटोदा) येथील ३० शाळकरी मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकृष्ण इघारे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी जीवन राजपूत उपशिक्षणाधिकारी सय्यद अंजुम, विस्तार अधिकारी श्री.पल्लेवाड, शिक्षक राहुल डोंगर उपस्थित होत्या.
या संवादातून प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य विद्यार्थी यांच्यातील दरी कमी होऊन एक अतिशय सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
अपयश हीच यशाची पहिली पायरी: जिल्हाधिकाऱ्यांचा प्रवास
या गप्पागोष्टींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. लहानपणी आयएएस (IAS) होण्याचे आपले कोणतेही स्वप्न नव्हते, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. २०१० मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही, परंतु तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. सुरुवातीला त्यांची भारतीय महसूल सेवेत (IRS - कस्टम्स आणि जीएसटी) निवड झाली आणि त्यानंतरच्या प्रयत्नात ते आयएएस झाले. "कोणतीही गोष्ट पहिल्या प्रयत्नात मिळेलच असे नाही, त्यामुळे नेहमी दुसरा पर्याय (Plan B) तयार ठेवावा आणि सातत्याने प्रयत्न करत राहावे," असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बीडचे भविष्य तुमच्याच हाती!
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास जगताना म्हणाले की. "तुम्हीच बीडचे भविष्य आहात, त्यामुळे बीडचा विकास आणि सकारात्मक बदल तुमच्यावरच अवलंबून आहे," अशी प्रेरणा त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत; मग ते प्रशासकीय अधिकारी होण्याचे असो, डॉक्टर होण्याचे असो, व्यवसाय करण्याचे असो किंवा नासा (NASA) आणि इस्रोसारख्या (ISRO) संस्थांमध्ये जाण्याचे असो. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
दुष्काळ, शेती आणि पर्यावरण: मुलांचे अभ्यासपूर्ण प्रश्न
या गप्पांमध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी सर्वांनाच थक्क केले. बीडमधील दुष्काळ आणि शेतीच्या समस्यांवर मुलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी एल निनो (El Nino) प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कसे कमी झाले आहे हे समजावून सांगितले. तसेच, कमी पाण्यात आणि कमी वेळेत येणाऱ्या सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल का वाढला आहे, यावरही चर्चा केली. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी हायड्रोपोनिक्स (Hydroponics) आणि सुका चारा (Dry fodder) यांसारखे आधुनिक पर्याय कसे वापरता येतील, याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत, "पुढच्या पावसाळ्यात प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत," असे आवाहन त्यांनी केले.
विकासाची नवी स्वप्ने आणि शिस्त
बीड जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू झाली. आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक तारांगण (Planetarium) देखील उभारले जात आहे. याचबरोबर त्यांनी नागरिकत्वाची जबाबदारी आणि शिस्तीचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. ट्रॅफिक नियमांचे पालन करणे, हेल्मेट वापरणे या सवयी लहानपणापासूनच कशा अंगीकारल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी केरळ आणि इतर देशांतील उदाहरणे दिली.
'कलेक्टरशी गप्पा' हा उपक्रम केवळ एका अधिकाऱ्याचा विद्यार्थ्यांसोबतचा संवाद नव्हता, तर ती बीडच्या उज्ज्वल भविष्याची पेरणी होती. एका सर्वोच्च पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने अत्यंत साधेपणाने आणि मित्रत्वाने मुलांच्या मनात ज्ञानाची, आत्मविश्वासाची आणि जिद्दीची ज्योत पेटवली.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!