बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव (आमला) येथे जुन्या वादाची कुरापत काढून एकाच कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी विक्रम देवकर यांच्या घरावर हल्ला चढवला. 'लक्ष्या कुठे आहे' अशी विचारणा करत आरोपींनी देवकर यांच्यासह त्यांच्या वृद्ध आई, भावजय आणि सुनेला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.

या हल्ल्यादरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडी आणि बुलेट दुचाकीची तोडफोड करून मोठे नुकसान केले, तसेच सर्वांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी विक्रम देवकर यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात मुकुंद खेत्रे, भागवत खेत्रे यांच्यासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.