बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकी पेशाला कलंक लावणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींचा शाळेतच लैंगिक छळ करणाऱ्या अविनाश ढेरे या शिक्षकाला संतप्त ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या नराधम शिक्षकावर गेवराई पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
बीड येथील रहिवासी असलेला आरोपी शिक्षक अविनाश ढेरे याने १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शाळेच्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना वर्गात थांबवून त्यांच्याशी अश्लील चाळे केले. तसेच त्यांच्या अंगावरून हात फिरवत गैरवर्तन केले. गुरुवारी सायंकाळी एका पीडित मुलीने रडत घरी जाऊन आईला घडलेला भयानक प्रकार सांगितला. त्यानंतर इतर मुलींसोबतही असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले.
संतापलेल्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ शाळेत धाव घेत या शिक्षकाला जाब विचारला आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत कदम पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे तर समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!