बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगी येथे शेताच्या सामाईक बांधावरील लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात एका सत्तर वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पंढरीनाथ महादेव कोलंगुडे हे आपल्या शेळ्यांसाठी लिंबाचे फाटे तोडत असताना हा वाद पेटला.

शेजारील शेतकरी देवीदास केरू शेळके आणि विजय देवीदास शेळके यांनी सामाईक लिंबाचे फाटे का तोडले यावरून पंढरीनाथ यांना जाब विचारला. विजयने वृद्धाला पकडून नाकावर जोरदार बुक्की मारली, तर देवीदासने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला पाच टाके पडले असून नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.