बीड: आंथरवण पिंप्री तांडा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत कोयते, कुऱ्हाडी आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी आणि त्यापूर्वी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर सशस्त्र हाणामारीत झाले.
रंजीत विश्वनाथ पवार (वय ३४, राहणार आंथरवण पिंप्री तांडा, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरासमोर गुटखा थुंकण्यावरून आणि शिवीगाळ करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर पांडुरंग रामभाऊ पवार आणि इतर ११ जणांनी संगनमत करून रंजीत आणि त्यांच्या नातेवाईकांवर हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत विश्वनाथ पवार आणि बबन पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिवनज्योत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुसऱ्या गटातील पांडुरंग रामभाऊ पवार (वय ५०, राहणार आंथरवण पिंप्री तांडा, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिलांकडे बघून शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हा वाद झाला. रंजीत पवार, सुरेश पवार आणि इतर ११ जणांनी पांडुरंग यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर कोयता, कुऱ्हाड आणि तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केले. या जखमींवर लोटस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दंगल आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप शहाजी थोरवे हे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!