धाराशिव: जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे एका अत्यंत संतापजनक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी येथील एका कुटुंबाने स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या रेशनच्या तांदळात चक्क ६ ते ७ दातांची कवळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरिबांच्या ताटात जाणारे हे धान्य किती निकृष्ट आणि जीवघेणे असू शकते, याचा हा भयानक पुरावा असून या प्रकारामुळे अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तांदूळ निवडताना उघडकीस आला प्रकार
जेवळी येथील रहिवासी भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी 'गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार' या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून कुटुंबासाठी रेशनचे धान्य आणले होते. सायंकाळी त्यांच्या सुनेने भात शिजवण्यासाठी पिशवीतील तांदूळ चाळणीत घेतले. तांदूळ निवडत असताना त्यांना त्यात चक्क ६ ते ७ दातांचा सांगाडा (कवळी) आढळून आला. हा किळसवाणा प्रकार पाहून बिराजदार कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला. सुदैवाने अन्न शिजवण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
दात मानवी की प्राण्याचे, तपास सुरू
तांदळात सापडलेले हे दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आहेत. प्राथमिक पाहणीत हे दात मानवी आहेत की एखाद्या प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, धान्याच्या पोत्यात असा किळसवाणा आणि घातक प्रकार कसा पोहोचला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
प्रशासनाकडून कारवाईची मागणी
या धक्कादायक घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच जेवळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाकडून गरिबांना वाटप करण्यात येणाऱ्या धान्यात असा गंभीर निष्काळजीपणा कसा काय होऊ शकतो, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित रेशन दुकानचालक आणि धान्य पुरवठादारावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!