मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (MPSC) इतर स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने पुण्यात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी सविस्तर सल्लामसलत केली. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा टास्क फोर्सच्या अध्यक्षा व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका गळती रोखणे, आणि विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारण यंत्रणेसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करून राज्याची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.

१८ हजारांहून अधिक सूचना प्राप्त
या उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे आतापर्यंत राज्यभरातून तब्बल १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त झाले आहेत. कार्यपद्धतीत वारंवार बदल न करता परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. यासोबतच विविध संवर्गांसाठी किमान पदसंख्या आधीच जाहीर करण्याची सूचनाही करण्यात आली. या समितीत पोलीस महासंचालक सदानंद दाते, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

'झिरो लीक' हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट
प्रश्नपत्रिका गळतीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी 'झिरो लीक' हेच या समितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते वितरणापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा समितीचा मानस असून, प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीलाही तो कोणत्या परीक्षेसाठी आहे, याची माहिती नसावी अशा ई-प्रश्नसंचाचा विचार सुरू आहे. तसेच, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि उत्तरतालिकेतील चुका टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

पुढील एक वर्ष 'ओएमआर' पद्धतीनेच परीक्षा
एकाच उमेदवाराची अनेक पदांवर निवड झाल्यास 'ऑप्टिंग आऊट' प्रक्रियेबाबत स्पष्ट धोरण असावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, पुढील एक वर्षभर ऑनलाइन परीक्षा न घेता जुन्याच 'ओएमआर' (OMR) पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महत्त्वाची माहिती व्ही. राधा यांनी दिली. यासाठी प्रमाणित नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.

इतर राज्यांच्या मॉडेल्सचा अभ्यास आणि एमपीएससीचे बळकटीकरण
स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक विश्वासार्ह करण्यासाठी तमिळनाडू, गुजरात आणि संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. तसेच एमपीएससीवरील वाढती जबाबदारी लक्षात घेता आयोगाचे मनुष्यबळ आणि संस्थात्मक रचना अधिक बळकट करण्याची गरज पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केली. सर्व भागधारकांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून योग्य त्या सुधारणा केल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.