अंबाजोगाई-: महाराष्ट्राचे कुलदैवत आणि अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे. या नवरात्रीच्या काळात देवीच्या गाभाऱ्याचे रूप दररोज खुलते. याचे कारण म्हणजे दररोज केली जाणारी नयनरम्य फुलांची सजावट. आणि या सजावटीमागे आहे पुण्यात स्थायिक असलेल्या एका भूमीपुत्राची १० वर्षांपासूनची अखंड भक्ती.

पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक आणि मूळचे अंबाजोगाईचे भूमीपुत्र रसिक कुंकुलोळ आणि त्यांचे सुपुत्र प्रितेश कुंकुलोळ हे गेल्या दशकापासून नवरात्रीच्या नऊही दिवस देवीच्या सजावटीसाठी पुण्याहून विशेष फुले आणि सजावटीचे साहित्य पाठवतात. देवीच्या गाभाऱ्यात दररोज सकाळी वेगळ्या रंगसंगतीची, वेगळ्या फुलांची आकर्षक आरास केली जाते. कधी शेवंती झेंडू आणि गुलाबाचा साज, तर कधी लिली, जरबेरा, मोगरा आणि ऑर्किडच्या विदेशी फुलांची आरास. पुण्यातील फुलबाजारातून निवडक, ताजी आणि आकर्षक फुले थेट अंबाजोगाईला पाठवली जातात. त्यामुळे नवरात्रात दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला देवीचे नवे, प्रसन्न रूप पाहायला मिळते.

त्यांच्या या पुष्पसेवेमुळे नवरात्र महोत्सवाची शोभा अधिकच वाढली आहे. केवळ पैशांची मदत नाही, तर आईच्या गाभाऱ्यासाठी स्वतः जातीने लक्ष देऊन, दररोज नवी संकल्पना पाठवणे, हे त्यांच्या भक्तीचे वेगळेपण आहे. भाविकांसाठीही ही पर्वणीच ठरत आहे. दररोज सोशल मीडियावर देवीच्या नव्या सजावटीचे फोटो व्हायरल होत असून, "आज कोणती सजावट असेल?" याची उत्सुकता भाविकांमध्ये असते.

श्री योगेश्वरी देवी मंदिर संस्थानच्या वतीनेही कुंकुलोळ कुटुंबीयांच्या या अविरत पुष्पसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. एका भूमीपुत्राने आपल्या गावच्या देवतेशी जपलेले हे फुलांसारखे सुंदर नाते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

-----

आम्ही पुण्यात असलो तरी आमचे मन अंबाजोगाईत आणि योगेश्वरी देवीच्या चरणीच असते. आई योगेश्वरीच्या सेवेची ही संधी मिळते. हेच आमचे भाग्य आहे," अशी भावना व्यक्त केली.

-: रसिक कुंकुलोळ, उद्योजक.