केज - जनतेच्या विविध समस्या, मागण्या आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने हे सेवा संकल्प अभियान घेण्यात येत आहे. या अभियानाचा शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अशोक भंडारे यांनी केले. 

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्यात सेवा संकल्प अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्याचा निर्णय घेतला होता. या शासन निर्णयानुसार केज येथील तहसील कार्यालयात शनिवारी आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या उदघाटनप्रसंगी तहसीलदार अशोक भंडारे हे बोलत होते. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षण अधिकारी सुजाता रामटेके - मेश्राम, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित ढोपे, सहाय्यक गटविकास अधिकारी अभिमान राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण थळकरी, पत्रकार गौतम बचुटे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप कोठावळे, मंडळ अधिकारी वर्षा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराचे नियोजन केजच्या मंडळ अधिकारी नीता पल्लेवाड यांनी केले होते. 

       यावेळी मुख्याधिकारी ढोपे म्हणाले की, या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, म्हणून एका छताखाली सर्व विभाग उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थ्यांच्या अडचणी सुटण्यास मदत होईल. तर पशुधन विकास अधिकारी डॉ. थळकरी यांनी दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुपालक व शेतकऱ्यांनी जनावरांच्या चारा - पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. 

     यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी शिधा पत्रिकेचे बळवंतसिंह गोके, शरद काळे यांच्यासह १४ लाभार्थ्यांना, जिवंत सातबारा, आठ अ, फेरफार नक्कलचे चंद्रकांत हजारे, दत्तात्रय हजारे यांच्यासह २५ लाभार्थी शेतकऱ्यांना, डोमीसाईल व नॉन क्रिमिलेअर मोहंमद खुरेशी, अलफिया शेख या लाभार्थ्यांना तर कृषी विभागामार्फत ट्रॅक्टरसाठी पात्र ठरलेल्या महादेव मिठू गालफाडे, अशोक अर्जुनराव लोंढे या दोन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.

      सूत्रसंचालन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. कार्यक्रमाला पेशकार वैशाली भिसे, तलाठी नादरगे, महसूल सहाय्यक संजय सराफ, सहाय्यक कृषी अधिकारी रिंकल पवार - सोनवणे, सहाय्यक कृषी अधिकारी नवगिरे यांच्यासह महसूल, कृषीसह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.