बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या महत्त्वपूर्ण मांजरा धरणात अवघा ८.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तीनही जिल्ह्यांवर तीव्र पाणीसंकट ओढवले आहे. पावसाने दगा दिल्याने धरणातील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून शेती व सिंचनाचा उपसा तात्काळ प्रभावाने पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
ऑक्टोबर हीटमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला
यंदा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठा आधीच नीचांकी पातळीवर गेला आहे. त्यातच वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे धरणातील पाण्याचे दररोज ०.०८५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) वेगाने बाष्पीभवन होत असल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. आगामी उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा थेंबन् थेंब वाचवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान बनले आहे.
अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणातून होणारा बेकायदेशीर पाण्याचा उपसा रोखण्यासाठी जलसंपदा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवैध उपशावर नजर ठेवण्यासाठी चार विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. नियम डावलून पाणी उपसा करणाऱ्यांचे साहित्य जप्त करून संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा धरण अभियंता नामदेव घोडके यांनी दिला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!