केज (प्रतिनिधी): मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांना केज विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम घ्यावेत, असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी केले आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या अनुभवी नेतृत्वाला पुन्हा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडीवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

आमदार सतीश चव्हाण यांना विधानपरिषदेतील कार्याचा १८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. संपूर्ण मराठवाड्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून स्थानिक प्रश्नांची अचूक जाण आणि ते प्रश्न सोडवण्याची धमक त्यांच्यात आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक आणि बेरोजगार तरुणांचे प्रश्न सातत्याने मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे, असे आमदार नमिता मुंदडा यांनी नमूद केले.

भरीव कार्य आणि जनसंपर्काच्या जोरावर या निवडणुकीत सतीश चव्हाण यांचा सलग चौथा विजय निश्चित मानला जात आहे. या विजयात केज विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असावा, यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. प्रत्येक कार्यकर्त्याने पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधून महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय सुकर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार मुंदडा यांनी केले आहे.